अमित शहा, उद्धव ठाकरे पोस्टरवरून गायब, चर्चा तर होणारच!

मुंबई : एखाद्या बड्या नेत्याचा फोटो जेव्हा गायब होतो, तेव्हा लगेच चर्चा रंगू लागते. भाजपाच्या पोस्टरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पोस्टरवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज प्रथमच नागपुरात दाखल झाले. राज्यात भाजपाची सत्ता स्थापन होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले. ‘त्याग की मूर्ती’, ‘देवमाणूस’, ‘महाराष्ट्राचा वाघ’, ‘तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार…’ अशी स्तुतीसुमने या बॅनरच्या माध्यमातून फडणवीसांच्या समर्थकांनी उधळली. पण त्यातल्या अनेक पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फोटो झळकले. पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा फोटो मात्र नाही. त्यामुळे एक वेगळीच कुजबुज सुरू झाली होती.

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ते सहभागी होत असल्याचे आधी नड्डा आणि नंतर अमित शहा यांचे ट्वीटरवरून जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्यावेळी भाजपा कार्यालयात झालेल्या जल्लोषाच्या वेळी हेच पाहायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर ही कुजबुज सुरू झाली. तथापि, पंतप्रधान म्हणून मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डा आणि नागपूरचे असल्याने गडकरी यांचा फोटो पोस्टरवर असल्याचे सांगण्यात आले.

तर, अशीच चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरबाबत सुरू आहे. शिंदे यांच्या स्वागतासाठी तसेच समर्थनासाठी झळकलेल्या पोस्टर्सवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे. शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी ‘उठाव’ करत आपण शिवसेनेत असल्याचे म्हटले आहे. जर ते शिवसेनेत आहेत तर, त्यांच्या पोस्टरवर पक्षप्रमुखांचा फोटो का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता नेमकी शिवसेना कोणाची याचा फैसला येत्या 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होईल.