जवाहरलाल नेहरूंनी जिना यांच्यासमोर गुडघे टेकले, भाजपाचा व्हिडीओद्वारे काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उद्या साजरा करणार आहोत. त्याच्या पूर्वसंध्येला भाजपाने ‘फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवसा’चे निमित्त साधत एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात 1947च्या फाळणीला जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरले आहे. पाकिस्ताननिर्मितीची मागणी करणाऱ्या मोहम्मद अली जिना यांच्यासमोर त्यांनी गुडघे टेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्यावर्षी 14 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस’ जाहीर केला होता. 1947मध्ये झालेल्या फाळणीच्या कटू घटनेत भारतीयांनी भोगलेल्या यातना आणि बलिदानाची आठवण म्हणून 14 ऑगस्ट हा ‘फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. याचसंदर्भात नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ट्वीट देखील केले आहे.

भाजपाने जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये फाळणीचा नकाशा तयार करणाऱ्या साईरील जॉन रॅडक्लिफ यांना दाखविण्यात आले आहे. त्यांनी पंजाब आणि बंगालचे जवळपास अर्धे-अर्धे विभाजन केले होते. ज्या व्यक्तीला सांस्कृतिक पंरपरेचे अजिबात ज्ञान नाही, त्या व्यक्तीला अवघ्या काही आठवड्यांतच भारताचे विभाजन करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल भाजपाने केला आहे. संपूर्ण व्हिडीओ नेहरू केंद्रीत असून व्हॉईस ओव्हरमध्ये फाळणीची भीषणता कथन करण्यात आली आहे.

ज्या लोकांना भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा, मूल्य, तीर्थक्षेत्रांची काहीही माहिती नाही, अशांनी केवळ तीन आठवड्यांत, हजारो वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या लोकांमध्ये सीमारेषा आखली आहे. अशा फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढणारे कुठे होते, असा सवाल भाजपाने हा व्हिडीओ ट्वीट करताना विचारला आहे.

काँग्रेसचा पलटवार
‘फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस’ पाळण्यामागे सर्वात वेदनादायक ऐतिहासिक घटनांचा राजकीय लाभ उठवण्याचा मानस पंतप्रधान मोदी यांचा असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आधुनिक काळातील सावरकर आणि जिना यांचा आजही सुरू असल्याचे सांगून जयराम रमेश म्हणाले, दोन राष्ट्रांची संकल्पना सावरकर यांनी मांडली होती आणि जिना यांनी ती पुढे नेली हे वास्तव आहे. फाळणीचा स्वीकार केला नाही तर, भारत अनेक तुकड्यांमध्ये विभागला जाईल, असे मला वाटत असल्याचे पटेल यांनी लिहिले होते.
गांधी, नेहरू, पटेल आणि अन्य नेत्यांचा वारसा पुढे नेत काँग्रेसच देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत राहील आणि द्वेषाच्या राजकारणाचा पराभव करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.