पवार जे बोलतात त्याच्याविरूद्ध घडते…, प्रवीण दरेकर यांचा पलटवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मध्यावधी निवडणुकीचे भाकीत वर्तवले होते. त्यावरून भाजपाने पलटवार केला आहे. पवार जे बोलतात, त्याच्याविरुद्ध घडते, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही. पाच-सहा महिन्यांत मध्यावधी निवडणूक लागेल, असे भाकीत शरद पवार यांनी काल केले. तसेच, त्याच्या तयारीला लागण्याची सूचनाही महाविकास आघाडीला दिली.

त्यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी, पवार बोलतात त्याच्याविरूद्ध घडते, आमचे सरकार पुढची दशकानुदशके टिकेल, असा पलटवार केला. शिंदे सरकार आज बहुमात चाचणीला सामोरे जात असून कालच्या पेक्षा आज जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा दावाही त्यांनी केला.

अतुल भातखळकरांची टीका
शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीच्या केलेल्या भाकिताची भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील मोदी सरकार येणार नाही आणि आले तरी 12/13 दिवसांमध्ये कोसळेल, अशी बोगस भविष्यवाणी शरद पवार यांनी केली होती, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

हेही वाचा – ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामिल