…तर भाजपनं शरद पवारांना पाठिंबा द्यायला हवा, संजय राऊतांचा सल्ला

देश पुन्हा उभा करायचा आहे, या देशाच्या घटनेचं रक्षण करायचं आहे. या देशातील जनतेचं स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. या देशाला एखाद्या नेत्याच्या अनुभवाचा लाभ होईल, असं जर कोणी नेता असेल तर ते शरद पवारच आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

Sanjay Raut

मुंबईः भारतीय जनता पक्षाला देशाला एक मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल, संविधानाचे रक्षण करणारा तर त्यांनी सुद्धा शरद पवार साहेबांनाच पाठिंबा दिला पाहिजे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

देश पुन्हा उभा करायचा आहे, या देशाच्या घटनेचं रक्षण करायचं आहे. या देशातील जनतेचं स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. या देशाला एखाद्या नेत्याच्या अनुभवाचा लाभ होईल, असं जर कोणी नेता असेल तर ते शरद पवारच आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

पण राज्यकर्त्यांचं मन त्यासाठी मोठं असावं लागतं. मन मोठं असेल तर ते अशा प्रकारच्या नेत्यांना पाठबळ देतात. जरी विरोधी पक्षाचा असला तरी हा राष्ट्रपती व्हायला हरकत नाही, असं मतदारांना वाटावं, देशाला वाटवं, असा चेहरा याक्षणी उभा करणं हे महत्त्वाचं आहे. तो उभा राहिल्यानंतर शिवसेनेचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे निर्णय घेतील. नक्कीच आम्ही विरोधी पक्षातील महत्त्वाचे स्तंभ आहोत. त्यानंतर आमचे उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलंय.

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपण उमेदवार नाही : शरद पवार

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपण उमेदवार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु होती. परंतु शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष उमेदवाराच्या नावांची चर्चा करत आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु शरद पवारांनी स्पष्टीकरण देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये नसून उमेदवारी देणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.


हेही वाचाः मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार