आता मुंबई मनपा माफियामुक्त करणार, भाजपाचा निर्धार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता सत्तांतर होऊन भाजपाप्रणित सरकार महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे आता भाजपाने मुंबई महापालिका देखील काबीज करण्याचा निर्धार केला आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात दररोज नाट्यमय घडामोडी घडत होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम बंडाचे निशाण फडकावले. त्याला सत्ताधारी आघाडीतील शिवसेना व इतर आमदारांनी साथ दिली. जवळपास 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमातात आले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार होते. पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यावरून भाजपाने आक्रमक होत आघाडी सरकार व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र माफियामुक्त होत आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेला माफियामुक्त करणार, असा निर्धार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून केला आहे.