घरराजकारणअहमदनगर जिल्ह्याचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' नामांतर होणार, केंद्राला पत्र पाठविण्यासाठी केसरकर घेणार मंत्रिमंडळाची...

अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतर होणार, केंद्राला पत्र पाठविण्यासाठी केसरकर घेणार मंत्रिमंडळाची बैठक

Subscribe

अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार  गोपीचंद पडळकर यांनी  तारांकित प्रश्न केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी वरील  माहिती दिली

नागपूर : अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करण्यात येणार आहे. याबाबत मुंबईत लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारला पत्र पाठविले जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी वरील माहिती दिली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला असून, त्यांच्या इतिहासाचे स्मरण होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु राज्य सरकारने अद्यापही त्याची पूर्तता केली नाही, अशी खंत पडळकर यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनीही उपप्रश्न विचारून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यावर केसरकर म्हणाले, अहमदनगरच्या नामांतरासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त, विभागीय रेल्वे कार्यालय व्यवस्थापक, मुख्य पोस्ट ऑफिस तसेच तहसीलदार, महसूल विभागाला जिल्ह्याची माहिती सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये कळविण्यात आले आहे. सदरची माहिती  ऐतिहासिक असते. त्यामुळे माहिती संकलित करण्यात वेळ लागतो. तरीही सभागृहाची भावना लक्षात घेऊन या सर्व कार्यालयांना लवकरच स्मरणपत्रे पाठविण्यात येतील. तसेच यासंदर्भात मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारकडे शिफारसपत्र पाठविले जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. केसरकर यांच्या या ग्वाहीमुळे सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके बाजूने अभिनंदन केले.

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात पत्र लिहिल्यानं हा विषय चर्चेत आला होता. हिंदू राजमाता पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे भारताचं प्रेरणास्थान आहे. हिंदुस्थान मुस्लिम राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात असताना अहिल्यादेवींनी हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, तसेच त्यांचा जीर्णोद्धार केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झालेल्या अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे, अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचं गोपीचंद पडळकरांनी पत्रात म्हटलं होते.

- Advertisement -

हेही वाचाः सदसद्विवेकबुद्धीला स्मरून गायरान जमीन वाटपाचा निर्णय; अब्दुल सत्तारांचं विधानसभेत स्पष्टीकरण

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -