चंद्रकांत पाटील म्हणतात, मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले

chandrakant patil says bjp do not interfere in eknath shinde revolt from shivsena

मुंबई : सत्ता स्थापन करताना योग्य संदेश जाईल, जो स्थिरता देऊ शकेल अशा एका नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा यांच्यासह राज्यातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष असे जवळपास 800 पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेससमवेत आघाडी करणाऱ्या शिवसेनेवर टीका केली.

शिवसेनेशी युती केल्याने १६१ आमदारांच्या संख्याबळावर सरकार स्थापन होऊ शकले असते. पण वैचारिक साधर्म्य नसताना केवळ स्वार्थासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससमवेत आघाडी करून विश्वासघाताने सरकार स्थापन केले. या अडीच वर्षाच्या काळात भाजपाला संपविण्याचे खूप प्रयत्न झाले. पण आपण पुरून उरलो, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण कोरोना काळातही संघर्ष केला. पण त्याचवेळी लोकांच्या सेवेलाही उभे राहिलो होतो. एवढेच नव्हे तर, या अडीच वर्षांच्या काळात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यशही मिळविले.

हेही वाचा – गटातटाच्या राजकारणावरून दोन ‘रामां’चा संयम सुटला, एकमेकांना शिव्यांची लाखोली!

याच काळत हिंदुत्व संपविण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर एकेरी भाषेत टीका करण्यात आली. संघ आमचा आई-बाप आहे, त्यांच्यावरची टीका आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. संघ वजा केला तर, हिंदुत्वाबाबत देशात काय उरले असते, असा सवाल त्यांनी केला.

यासाठी नवीन सरकार येणे गरजेचे होते. स्थिरता देऊ शकेल अशी एका नेत्याची गरज होती. पण अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. केंद्रीय नेतृत्वाचा तसेच देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय होता. दु:ख झाले असले तरी, ते पचवून आनंदाने पुढे जायचे आहे, असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. केंद्राने दिलेल्या आदेशाप्रमाणे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्याबद्दल त्यांना सॅल्युट, असे ते म्हणाले.

हेही वाचा – उद्धव ठाकरे शिंदे गटाला राजकारणातून उठवणार, संजय राऊतांचा इशारा