घरराजकारण...म्हणूनच चहलसाहेब मी तुमचा सत्कार केला, मुख्यमंत्री शिंदेच्या फटकेबाजीला इंजिनिअर्सची दाद

…म्हणूनच चहलसाहेब मी तुमचा सत्कार केला, मुख्यमंत्री शिंदेच्या फटकेबाजीला इंजिनिअर्सची दाद

Subscribe

मुंबई : राज्यात सत्तेची सूत्रे हलविणारे हात बदलले की, प्रशासकीय पातळीवर देखील त्याचे प्रतिबिंब उमटते. याचा प्रत्यक्ष अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता येत आहे. याच अनुषंगाने गुरुवारी रवींद्र नाट्यमंदिरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकार-षटकार लगावले. विशेष म्हणजे, त्याला चहल यांच्यासह उपस्थित इंजिनिअर्सनी हसून दाद देत अधिकाऱ्यांना कामाप्रति जाणीवही मुख्यमंत्री शिंदे यांनी करून दिली.

राज्यात 1995मध्ये प्रथमच शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपाचे गोपीनाथ मुंडे विराजमान झाले. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते की, मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी, त्याचा ‘रिमोट कंट्रोल’ मात्र आपल्या हाती असेल. 2019मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन करत शिवसेना पुन्हा सत्तेवर आली. मुख्यमंत्रीपदी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण इतर खात्यांचा रिमोट कंट्रोल मात्र तिघांच्या हाती गेला.

- Advertisement -

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकासमंत्री होते. एवढे महत्त्वाचे खाते असूनही एकनाथ शिंदे यांचे अधिकार मर्यादित करण्यात आले होते. या खात्याचे बहुतांश निर्णय तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिन वरुण सरदेसाई किंवा मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत होते, असे सांगण्यात येते. मंत्रालयातील आणि सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना याची कल्पना असल्याने एकनाथ शिंदे यांना खात्यावर फारशी पकड ठेवता आली नाही. पण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने परिस्थिती बदलली आहे.

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांतर्फे रवींद्र नाट्य मंदिरात गुरुवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा, खासदार राहुल शेवाळे, मुंबई पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी राजाध्यक्ष आणि विकास नियोजन खात्याचे मुख्य अभियंता सुनील राठोडसह मुंबई महापालिकेचे शेकडो इंजिनिअर्स उपस्थित होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. राज्यात आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे, म्हणूनच चहलसाहेब तुमचा सत्कार केला…, असे सांगत त्यांनी या फटकेबाजीला सुरुवात केली.

- Advertisement -

यंदा सण-उत्सवावर कोणतीही बंधने नसतील. त्यामुळे हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सवात मंडळांकडून परवानगीसाठी किती पैसे मिळतात, असे चहल यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘अगदी थोडे.’ मी म्हणालो, ‘मग ते सोडून द्या. गणेश मंडळांना मंडपासाठीचे शुल्क यंदा माफ करण्यात आले. आता नवरात्रौत्सवातही तेच करा, त्यामुळे नवरात्रीही जोरात मुंबईसह राज्यभरात होईल. म्हणूनच चहलसाहेब तुमचा सत्कार केला, असे मुख्यमंत्री म्हणताच सभागृहात हशा पिकला.

ठाण्याप्रमाणे दिवाळीत संपूर्ण मुंबईत विद्युत रोषणाई करा, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी, म्हणूनच चहलसाहेब तुमचा मी सत्कार केला, असे सांगत कोपरखळी लगावली. यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी तसेच इतर प्रशासकीय बाबींसाठी ज्यावेळी मी फोन करायचो, तेव्हा काही अधिकारी व्यस्त असायचे. मी सांगायचे काम करायचो. त्यांना मिळालेल्या आदेशाप्रमाणे टाळायचे काम करायचे. पण मी तक्रार कधी केली नाही. दरवर्षी खड्ड्यांवरून महापालिकेला टार्गेट केले जाते. पण आता आपण मुंबईतील बहुतांश रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण करणार आहोत, त्यामुळे खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना आणावी लागेल. मला या कार्यक्रमाला येण्याअगोदर असे सांगण्यात आले होते की, एकदाही मुख्यमंत्री या कार्यक्रमाला आले नाहीत. पण इंजिनिअर्समुळेच कौतुकाची थाप अनेकदा राजकारण्यांना मिळते. त्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक करण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुमची श्रेणीवाढ, राज्य सरकारनुसार पगारवाढ ही मागणी मी तात्काळ मंजूर करत आहे आणि चहलसाहेबांनी ते तात्काळ करून घ्याव. त्यासाठीच मी त्यांचा सत्कार केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर चहल यांनी होकारार्थी मान डोलावताच सभागृहातील सर्व अभियंत्यांनी टाळ्यांचा गजर केला.

नगरविकास खात्याचे मंत्री असताना सुद्धा सिडको, एमएमआरडीए तसेच महापालिका येथील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या आदेशाकडे कानाडोळा करत होते. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कानपिचक्या दिल्या.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -