राज्यातील त्रिकूट सरकारमुळे राज्य अधोगतीकडे जात आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकारांवरून कोल्ड वॉर सुरू आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ( Cold war between Chief Minister and Deputy Chief Minister over powers Criticism of Vijay Wadettiwar )
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रुम तयार केली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात बैठक घेतली. प्रकल्पांना गती देण्यासाठी पवार यांनी आपल्या स्तरावर मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे. वॉर रुम कार्यरत असताना अजित पवार यांनी नव्यानं मॉनिटरिंग कक्ष स्थापन केल्यानं हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल, गुरूवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाष्य केलं. यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांना मणिपूरवर बोलायचं होतं, परंतु ते मेघालय, राजस्थानवर बोलले. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 75 टक्के भाषण केवळ काँग्रेसवरच होतं. त्यांच्या मनात काँग्रेस संदर्भात भीती आहे, म्हणूनच त्यांनी भाषण हे काँग्रेसवर केलं, अशी टीका वडेट्ट्वारांनी केली. पंतप्रधानांचं भाषण म्हणजे खोटं बोला रेटून बोला, एवढचं त्या भाषणाचं सार आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. विशेष म्हणजे, राहुल गांधींनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही, म्हणून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची दिशा बदलली, हे आता स्पष्ट झाल्याचंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही, तर… वाचा राऊतांच्या मुलाखतीतील स्फोटक वक्तव्यं )
गांधी, नेहरूंमुळे देश उभा…
राहुल गांधी सभागृहात 36 मीनिटं बोलले होते परंतु त्यातील केवळ 4 मीनिटं त्यांच्यावर कॅमेरा होता. यावर उत्तर देताना, विजय वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधींना संपूर्ण भाजप घाबरलं आहे. एक खौफ त्यांच्या नावाचा निर्माण झाला आहे. गांधींची भीती या भाजपला आहे. गांधी, नेहरू यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. हे सर्व जे काही आहे, गांधींनी हा देश उभा करण्याचं काम केलं आहे. ज्या देशात काहीही नव्हतं तो देश जर आता स्वबळावर उभा राहिला असेल तर तो गांधी आणि नेहरुंमुळे झाला आहे. त्यामुळे गांधी नावाची दहशत अजूनही भाजपला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.