छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन वर्षांत दोन वेळा वाद अन् भाजपाची गोची!

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून वादंग निर्माण झाला आहे. या दोघांच्या वक्तव्यामुळे भाजपाची गोची झाली आहे. विशेष म्हणजे, उत्तर भारतीयांकडून होणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे दोन वर्षांत दोनवेळा भाजपावर नामुष्की ओढावली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याच वादग्रस्त विधानावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चर्चेत भाजपचे प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबला पत्र लिहून माफी मागितली होती, असे त्यावेळी वक्तव्य केले होते.

राज्यपाल कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आहेत. तुमचे हीरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी केले. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपालांनी हे वक्तव्य केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा आलेला नाही. पण सुधांशू त्रिवेदी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला कायमच आदर असल्याचे म्हटले आहे. हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाचे सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचित देखील अनादर नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या उत्तर भारतीय नेत्यांमुळे असे वादंग वरचेवर निर्माण होत आहेत. दोन वर्षांपूर्वी भाजपाचे नेते जयभगवान गोयल यांनी एक पुस्तक लिहिले होते. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ असे त्या पुस्तकाचे नाव होते आणि त्याचे प्रकाशन दिल्लीतील भाजपा कार्यालयात जानेवारी 2020मध्ये झाले होते. त्यावरूनही मोठा वादंग निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. कोणीही त्याच्या विचारांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. सर्वच पक्षांनी शिवाजी महाराजांचे नाव राजकारणासाठी वापरले, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली होती. त्यानंतर गोयल यांनी माफी मागितली आणि पुस्तक मागे घेतले. यामध्ये भाजपाची गोची झाली होती.