घरराजकारणनिमित्त गोविंदाचे आणि रचले जातात 'राजकीय कोट्यांचे' थर...

निमित्त गोविंदाचे आणि रचले जातात ‘राजकीय कोट्यांचे’ थर…

Subscribe

मुंबई : राजकारणात आरोप-प्रत्यारोप तर होतच असतात. कधी-कधी पातळी ओलांडून आरोप केले जातात. पण कधी-कधी असेही प्रसंग येतात की, वातावरण हलके-फुलके होते आणि मंचावर रंगणारी राजकीय टोलेबाजीत सर्वजण हास्यात दंग होतात. सणवार तर सर्वांना एकत्र आणणारे असतात. त्यामुळे त्याचा उत्साह देखील ओसंडून वाहणारा असतो. गोविंदाच्या निमित्ताने देखील असे ‘राजकीय कोट्यां’चे थर लागल्याचे पाहायला मिळाले आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी ‘उठाव’ करून ठाकरे सरकार खाली खेचले आणि भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर गोविंदा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. त्यातच मुंबई, ठाणे, वसई-विरार अशा अनेक महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे त्याला राजकीय रंग देखील चढला आहे.

- Advertisement -

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि ठाण्यात विविध गोविंदा मंडळाना भेटी देत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांना संबोधून भाषण केले. ‘शेतकरी, कष्टकऱ्यांप्रमाणेच हे सरकार गोविंदांचेही आहे. दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली होती आणि त्यासाठी 50 थर लावले होते,’ अशी कोटी त्यांनी केली.

अशीच थरांची कोटी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील केली होती. उद्धव ठाकरे यांच्याशी बिनसल्यावर नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यांना तिथे मुख्यमंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. पण त्यावेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाची धुरा विलासराव देशमुख यांच्याकडे सोपविली. त्यामुळे नारायण राणे नाराज होते.

- Advertisement -

त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा घातली. 20 फुटांपेक्षा उंच दहीहंडी नसावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशांची माहिती देतानाच त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे सांगितले. पण त्याचबरोबर ‘सहाव्या मजल्यापर्यंत थर लागणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल,’ असे सांगायलाही ते विसरले नाहीत. मंत्रालयात मुख्यमत्रीपदाचे दालन सहाव्या मजल्यावर असल्याने हा टोला कोणासाठी होता, ते सर्वांना न सांगताच समजले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -