वारंवार शिवसेना फोडून बाळासाहेबांना यातना का दिल्या, केसरकरांचा शरद पवारांना सवाल

DEEPAK KESARKAR

नवी दिल्ली : राज्यातील राजकारणाची धार आणखी तीव्र झाली असून शिवसेनेतील शिंदे गटाने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत शिवसेनेत पडलेल्या फुटीमध्ये शरद पवार यांचा सहभाग होता, असा थेट आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी नवी दिल्लीत केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाली. त्यावेळी पुढील निवडणुकांमध्ये एक-दोन अपवाद वगळल्यास शिंदे गटातील एकही जण पुन्हा निवडून येणार नाही, असा दावा या बैठकीत शरद पवार यांनी केला. तसेच आवश्यक तिथे काँग्रेस आणि शिवसेनेला बरोबर घेण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याबद्दल केसरकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसैनिक केव्हाही बांधला जाणार नाही.

हेही वाचा – वसईत दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, एनडीआरएफ दाखल, चार जण बचावले

जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्यामागे शरद पवारांचाच हात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शरद पवार यांनी त्यांना यातना का दिल्या हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असे आवाहनही केसरकर यांनी केले. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात नवी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी केसरकर राजधानी दिल्लीत गेले असून तिथे ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मी मदत केली असली तरी, त्यांनी कोणत्या पक्षात जावे, ही अट मी घातलेली नाही, असे खुद्द शरद पवार यांनीच मला सांगितले होते, असा दावाही केसरकर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरे यांच्याबाबतीतही तेच झाले. राज ठाकरे यांना शरद पवारांचे आशीर्वाद होतेच. राज ठाकरेही त्यांना मानतात. इतर फुटीच्या वेळीही त्यावेळचे काँग्रेसचे नेते म्हणून ते होतेच, असा आरोप केसरकर यांनी केला.

हेही वाचा – राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी चिघळली; आणीबाणी जाहीर