शांततेची भूमिका घेऊन पुढाकार घ्यावा, दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांना सल्ला

shiv sena saamana on eknath shinde and bjp sanjay raut cm uddhav thackearay maharashtra political crisis

मुंबई : शिवसेनेतील दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. त्यातून त्या आशयाचे ट्वीट केले होते, असा खुलासा शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी केला आहे. पण त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शांततेची भूमिका घेऊन यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील ४० शिवसेना आमदारांच्या गटाने भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे उघडे आहेत, असे बंडखोर आमदारांना सांगितले आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ, असे बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, संजय राऊतांची मागणी

या पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही गटांना एकत्र यायचे आहे, मानापमानात सर्व अडकले आहे. शिवसेना एक कुटुंब असून ते तुटू नये, अशीच माझ्यासह सर्व शिवसैनिकांची भावना आहे. त्यातच सर्वांचे हित आहे, असे दीपाली सय्यद यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेनेच खासदार संजय राऊत हे बिनधास्त बोलतात. त्यांची तशी खास शैली आहे. पण ते जे बोलतात, ते शिवसेनेसाठी बोलतात; मग ते भाजपाला उद्देशून असो की, शिंदे गटाला! आता त्यांनी शांततेची भूमिका घेऊन दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला त्यांनी संजय राऊत यांना दिला.

राऊतांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याबद्दलचे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत, ‘त्यांना हा अधिकार कोणी दिला ते माहीत नाही,’ असे सुनावले. तर, ‘शिवसैनिकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही’ असे प्रत्युत्तर दीपाली सय्यद यांनी दिले.

हेही वाचा – सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना