नारायण राणेंची किरण पावसकरांनी घेतली भेट, दीपक केसरकरांचे मुख्य प्रवक्तेपद जाणार?

मुंबई : केंद्रीय नारायण राणे यांच्याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या किरण पावसकर यांनी आज सायंकाळी राणे यांची त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी भेट घेतली. या वादामुळे दीपक केसरकर यांचे मुख्य प्रवक्तेपद जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि संवाद थांबला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल केला होता. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून भाजपाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य न करण्याचे मान्य केले. असे असताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नारायण राणेंबद्दल वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. भाजपा मुख्यालयात आज सकाळी आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांनी केसरकर यांच्याबद्दल वक्तव्य करण्याचे टाळले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे सचिव किरण पावसकर यांनी आज सायंकाळी जुहू येथील अधीश बंगल्यावर नारायण राणे यांची भेट घेतली. आमदार दीपक केसरकर यांच्या वक्त्यव्यांवरून अनेक गैरसमज निर्माण झाले होते. ते दूर करण्यासाठी शिंदे गटाकडून किरण पावस्कर यांना शिष्टाईसाठी नारायण राणे यांना भेटण्यासाठी पाठवण्यात आले असल्याची सूत्रांची माहीती. या भेटीच्या वेळी भाजप आमदार नितेश राणेही उपस्थित होते. तथापि, या प्रकरणामुळे दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी कालच सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर फडणवीस यांनी देखील याची दखल आपण घेतली असल्याचे नितेश राणे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही नवी दिल्लीत आहेत. तिथे याबाबत झालेल्या चर्चेनुसार केसरकर यांनी मुंबईत, यापुढे पत्रकार परिषदेत मी राणेंचे नाव घेणार नाही, असे स्पष्ट केले. तर, किरण पावसकर यांनी राणेंची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.