याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेंच्या आवाहनावर एकनाथ शिंदेंचे प्रश्नचिन्ह

मुंबई : कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, माझ्यासमोर बसून शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बंडखोर आमदारांना केले आहे. मात्र या बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र हे आवाहन धुडाकवून लावताना शिवसेनेच्या दुटप्पीपणावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.

एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे तसेच त्यांचा बाप काढायचा; तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच जण संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी घातली होती. पण दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी या बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हाच विरोधाभास एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून निदर्शनास आणला आहे.