..,म्हणून आमचीच शिवसेना खरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

eknath shinde

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांनी आपलीच खरी शिवसेना आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात गेला आहे. मात्र, आपलीच खरी शिवसेना आहे, या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत.

गेल्या जूनमध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार खाली खेचले आणि भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर ‘शिवसेना नक्की कोणाची?’ हा संघर्ष सुरू झाला. आता निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत ‘शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आपल्याकडेच आहेत,’ हे सिद्ध करण्याचे आदेश दोन्ही गटांना दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग याबाबतची सुनावणी घेणार आहे.

हेही वाचा – गटातटाच्या राजकारणावरून दोन ‘रामां’चा संयम सुटला, एकमेकांना शिव्यांची लाखोली!

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, विधानसभेत पक्षातील जवळपास दोनतृतीयांश आमदार माझ्यासोबत आहेत. लोकसभेतही खासदार माझ्यासोबत आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना तसे पत्रही दिले होते. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ५५पैकी ४० आमदार, काही विधान परिषद सदस्य तसेच १८पैकी ११ खासदार आपल्यासोबत असल्याचे शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर १ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. तर, ८ ऑगस्टला निवडणूक आयोग खऱ्या शिवसेनेबाबत सुनावणी घेणार आहे. आपल्या गटाला ‘शिवसेना’ घोषित करावे आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह प्रदान करावे, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – शिवसेना कोणाची? संजय राऊतांनी दिली पुराव्यांची यादी