घरराजकारणसर्वाधिक बेईमानी आमच्याशी झाली, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेना दिला दुजोरा

सर्वाधिक बेईमानी आमच्याशी झाली, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेना दिला दुजोरा

Subscribe

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला दुजोरा देत, सर्वाधिक बेईमानी आमच्याशी झाली असल्याचे सांगितले.

राज्यातील 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि शिवसेनेत काय बोलणी झाली होती, याची मला माहिती नव्हती. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी दिल्लीला गेलो होतो. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांची भेट घेतल्यावर त्यावेळी मातोश्रीमध्ये बंद दाराआड नेमके काय बोलणे झाले हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोणताही शब्द दिला नव्हता. उलट आधीचाच फॉर्म्युला कायम ठेवण्यास सांगितले होते, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती शिंदे यांनी ठाण्यात दिली.

- Advertisement -

मात्र भाजपाशी काडीमोड घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, असा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बरोबर घेत सत्ता स्थापन केली होती.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे नेमके काय म्हणाले हे मला माहीत नाही. पण ते जे सांगत आहेत त्यात पूर्ण तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीही ठरला नव्हता आणि हे मी सुरुवातीपासून सांगत आहे. कारण मी स्वत: साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मी केल्या. त्यात अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला नव्हता.

- Advertisement -

मला आश्चर्य वाटते की, हे जे सारखे सांगत असतात, बेईमानी वगैरे, पण प्रत्यक्षात सर्वाधिक बेईमानी आमच्याबरोबर झाली आहे. आमच्यासोबत जे निवडून आले, त्यांनी आम्हाला सोडून विरोधकांशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. यापेक्षा आणखी काय विश्वासघात असू शकतो, असे फडणवीस म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -