घरराजकारण'ईडी'चे सरकार, पण 'एडी'च्या तीन वर्षांत तीन भूमिका; सर्वच अचंबित

‘ईडी’चे सरकार, पण ‘एडी’च्या तीन वर्षांत तीन भूमिका; सर्वच अचंबित

Subscribe

मुंबई : राज्यात 2019ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सतत नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण हे सरकार अडीच वर्षांत कोसळले आणि ‘ईडी’चे सरकार स्थापन झाले. मात्र सर्वत्र चर्चा सुरू आहे ती, ‘एडी’चीच.

एकनाथ शिंदे सरकारने रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी बहुमत चाचणी देखील जिंकली. त्याद्वारे ‘ईडी’ सरकारवर म्हणजेच, मुख्यमंत्री ‘ए’कनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री ‘दे’वेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर शिक्कामोर्तब झाले. आता ‘ईडी’बरोबरच ‘एडी’चीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ए म्हणजे अजित पवार आणि डी म्हणजे देंवेंद्र फडणवीस. हे दोन्ही नेते गेल्या तीन वर्षांत तीन भूमिकांमध्ये पाहायला मिळाले.

- Advertisement -

सन 2019मध्ये पहिले भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी राजभवनावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणे हे सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारे होते. विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केले होते. पण हे सरकार केवळ 80 तासांचे ठरले. सर्वोच्च न्यायालयाने खुले मतदान घेण्याचा आदेश दिल्यावर दोघांनीही राजीनामा दिला होता.

हेही वाचा – ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपुरात दाखल

- Advertisement -

त्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकार आले. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर, उपमुख्यमंत्रीपदावर अजित पवारच होते. म्हणजेच, अजित पवार यांची भूमिका कायम राहिली तर, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते बनले. त्यांनी विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली.

आता शिंदे सरकार स्थापन झाले आहे. वस्तुत:, ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर 106 आमदार असलेल्या भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे सर्वांना वाटले होते. पण 30 जून 2022 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले आणि सर्वांनाच धक्का दिला. परंतु केंद्रीय नेतृत्त्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यामुळे 2019मध्ये एकत्र येऊन सरकार स्थापन करणारे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या भूमिकांमध्ये अदलाबदल झाली आहे. आता उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर, विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार पाहायला मिळतील.

शिवसेना पायउतार, पुन्हा सत्तेत
मुख्यमंत्रीपदावरून भाजपाबरोबर बिनसल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले. पण शिवसेनेतील एका गटाने ‘उठाव’ केल्याने सरकार कोसळले. पण नंतर लगेच दोन दिवसांनी भाजपाच्या मदतीने शिवसेना शिंदे गटाच्या रुपाने पुन्हा सत्तेत आली. येत्या 11 तारखेला होणाऱ्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी आहे.
याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, 2019च्या निवडणुकीनंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. गेले अडीच वर्षं शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत होती. तर, आता शिवसेनेबरोबरच भाजपा सत्तेवर आली आहे.

हेही वाचा – मुसळधार पावसाचा फटका; कल्याणमध्ये दरड कोसळली, घरे पाण्याखाली

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -