गद्दारीला शिवसेनेत कधीही थारा नाही, ‘अस्सल शिवसेने’चा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेला हिंदुत्वाचा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आहे. गद्दारीला शिवसेनेत कधीही थारा मिळाला नाही. त्यामुळेच यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातून देण्यात आला आहे. शिवाय, शिवसेनेचा ‘अस्सल’ असा उल्लेख करतानाच शिंदे गटाला ‘मिंधे गट’ असे म्हटले आहे.

‘एक नेता, एक झेंडा आणि एकच मैदान’ अशी वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा बुधवारी शिवतीर्थावर होत आहे. ‘याचि देही, याचि डोळा’ या मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठ्या उत्साहात मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर निष्ठेचा धगधगता अंगारच अनुभवायला मिळणार असून गर्दीचे सारे विक्रम मोडीत निघणार आहेत. मुंबईत अस्सल शिवसेनेचे तुफान अटळ आहे, असे ‘सामना’तील वृत्तात म्हटले आहे.

मिंधे गटाने दसरा मेळाव्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, शिवतीर्थ मिळवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनावर दबाव टाकला गेला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने शिवसेनेच्या परंपरेवर शिक्कामोर्तब झाले आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापुढील विघ्न दूर झाले. आता वेळ आली आहे निष्ठेचे विराट रूप अनुभवण्याची आणि शिवतीर्थही दसरा मेळाव्यासाठी सज्ज झाले आहे. मेळाव्याआधी घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता यंदाचा मेळावा ‘न भुतो, न भविष्यति’ असेल हे स्पष्टच आहे. सायंकाळी साडेसहा वाजता हा मेळावा सुरू होणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यांतूनही एकनिष्ठ शिवसैनिकांचे जथे शिवतीर्थावर दाखल होऊ लागले आहेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी गद्दारी केली. हे फितूर सत्तापिपासू भाजपाला जाऊन मिळाले आणि राज्यात घटनाबाह्य ‘खोके सरकार’ बसले. या गद्दारीचा हिशेब चुकता करण्याची वेळ आता आली आहे आणि म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे. गद्दारांविरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड आणि संताप आहे. ते पाहता शिवतीर्थावरील महामेळाव्यात जो निष्ठेचा अंगार फुलणार आहे तो गद्दारांच्या उरात धडकी भरवणाराच ठरणार असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.

आनंद शिंदे यांचे गीत होणार रिलीज
यंदाच्या दसरा मेळाव्यात विख्यात गायक आनंद शिंदे यांनी शिवसेनेशी प्रतारणा केलेल्या गद्दारांवर हल्लाबोल करणारे विशेष गाणे गाजत आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला वगळून तुम्ही शिवसैनिक होऊन दावा रं…’ असे हे गीत स्वत: आनंद शिंदे यांनी लिहिले आणि गायले आहे. शिवतीर्थावर हे गीत रिलीज केले जाईल.