घरराजकारणपंकजा मुंडे यांना मिळणार मोठी जबाबदारी, गिरीश महाजनांकडून संकेत

पंकजा मुंडे यांना मिळणार मोठी जबाबदारी, गिरीश महाजनांकडून संकेत

Subscribe

जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबतची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांना कदाचित मोठे पद मिळू शकते, असे संकेत दिले.

तब्बल 39 दिवसांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजपा व शिंदे गट असे प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यावर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असते तेव्हा सर्वांना समाधानी करणे शक्य नसते. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचे समाधान करावे, अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना दिल्या आहेत. सतत चर्चेत असलेले माझे नाव आहे. पण अजूनही माझी पात्रता त्यांना वाटत नसेल; त्यामुळे मला मंत्रीपद दिले नसेल. जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा ते मंत्रीपद देतील. त्याबद्दल मला आक्षेप नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत, त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर तर सातत्याने अन्याय होत आहे. त्यांनी मंत्रीपदासाठी थेट पक्षश्रेष्ठींची भेट घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तसेच पंकजा मुंडे नाराज आहेत, असे मला वाटत नाही. पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील. कदाचित त्यांना मोठेपद मिळू शकते, असे महाजन म्हणाले.

- Advertisement -

संजय राठोड यांच्याबद्दल सावध प्रतिक्रिया
संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यावरून विरोधकानी टीका केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत गिरीश महाजन यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेच संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे आणि तेच आता टीका करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याबद्दल केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे ते म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -