मंदिरात गेले तर…, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर खोचक टीका

मुंबई : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर भाजपाच्या गिरीश महाजन यांच्यातील राजकीय कलगीतुरा जगजाहीर आहे. त्याची झलक आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अलीकडेच विधान परिषदेवर निवडून गेलेल्या खडसेंवर महाजन यांनी खोचक टीका केली आहे.

भाजपाने 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे ते नाराज होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची 27 मते घेऊन दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे त्यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा होती. पण त्यानंतर लगेचच राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यावरूनच गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – श्रीलंकेतील स्थिती आणखी गंभीर, नागरिक आक्रमक होताच राष्ट्रपतींचा पळ

मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी खोचक टीका महाजन यांनी केली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल विनोदाचा आधार घेत, महाजन यांनी ही टीका केली. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असे मी म्हणणार नाही, मी याला योगायोग म्हणेन. पण राजकारणात सत्ताबदल हा होतच असतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

शिवसेनेवर हल्लाबोल
आम्ही शिवसेना संपवण्याचे काम करत नाही. गेली निवडणूक एकत्रितपणे लढविली म्हणून तुमचे 55 आमदार निवडून आले. तुम्ही अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मते मागितली म्हणून तुमचे एवढे खासदार निवडून आले. अन्यथा तुमचे 15 आमदार आणि दोन खासदार तरी निवडून आले असते का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला.

हेही वाचा – ओबीसी आरक्षणाबाबत मुंडे बहीण – भावांचे ट्वीट, म्हणाले…