तुमच्यावर आमचा वॉच आहे, चुकीचे निर्णय घेतले तर समर्थन नाही; मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांना सुनावले

shinde and bjp

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी, त्यातील काही आमदारांच्या समावेशावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते. तुमच्यावर आमचा वॉच असून तुम्ही चुकीचे निर्णय घेतले तर, त्याचे अजिबात समर्थन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांना स्पष्टपणे सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.

संजय राठोड, डॉ. विजयकुमार गावित तसेच अब्दुल सत्तार हे प्रामुख्याने विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यातच आता 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. महाविकास आघाडीत सध्या बेबनाव दिसत असला तरी, इतर मुद्द्यांबरोबरच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. हे ध्यानी घेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना सावधगिरीचा इशारा दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी या नव्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडतानाच त्यांना कानपिचक्याही दिल्या. सर्वांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला देऊन, तुमच्यावर आमची नजर आहे, चांगला कारभार करा. चुकीचे निर्णय घेतले तर त्यावरून अजिबात पाठराखण केली जाणार नाही, असे या दोघांनी स्पष्ट केले. तथापि, तुम्हाला जाणूनबुजून लक्ष्य केले तर, तुम्हाला एकटे पडू देणार नाही, आम्ही देखील तुमच्यासोबत राहून त्याला तोंड देऊ, असेही या मंत्र्यांना सांगण्यात आले. तसेच मंत्र्यांनी एकमेकांवर टीका देखील करायची नाही. त्यासाठी परस्परातील मतभेद टाळा, असेही सुनावल्याचे सूत्रांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आपल्या पाठीशी एक महाशक्ती असल्याचे म्हटले होते. आता भाजपाच्या पाठबळावरच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे महत्त्व सांगतानाच गेल्या अडीच वर्षांत दुर्लक्षित केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीस प्राधान्य देण्याची सूचनाही मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना केली.