Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण अनिल परब यांचा फोन तपासा..., 'आपलं महानगर'च्या बातमीवर केसरकरांचे शिक्कामोर्तब

अनिल परब यांचा फोन तपासा…, ‘आपलं महानगर’च्या बातमीवर केसरकरांचे शिक्कामोर्तब

Subscribe

मुंबई : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. पण त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या मध्यस्थीने पॅचअपसाठी खूप प्रयत्न केले होते, असे सांगितले जाते. तसे वृत्तही ‘My Mahanagar’ आणि ‘आपलं महानगर’ने दिले होते. याचा शिवसेनेने इन्कार केला असला तरी, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यावर आज शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

संबंधित बातमी वाचापॅचअपसाठी परब, नार्वेकर आणि सरदेसाईंच्या माध्यमातून ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क, फडणवीसांचे मात्र तोंडावर बोट…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅचअपसाठी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना २१ ते २४ जून दरम्यान तीनदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता; तसेच जे काही बोलायचे ते दिल्लीतील नेतृत्वाशी बोला, असा निरोप दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली होती. ही बातमी ‘पॅचअपसाठी परब, नार्वेकर आणि सरदेसाईंच्या माध्यमातून ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क, फडणवीसांचे मात्र तोंडावर बोट…’ या शीर्षकाने मंगळवारी (१९ जुलै २०२२) ‘My Mahanagar’ आणि ‘आपलं महानगर’ने दिली होती.

- Advertisement -

अत्यंत विश्वासू समजले जाणारे विभागप्रमुख, तत्कालीन परिवहनमंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांच्या माध्यमातून खुद्द उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि एकत्र सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला. पण फडणवीस यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि आपले भाचे व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यामार्फत फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीस यांनी प्रतिसाद दिला नाही, असे वृत्त ‘महानगर’ने दिले होते.

याचसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज टिप्पणी केली. ‘उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता का, हे समोर आले पाहिजे. शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. पण तसे असेल तर अनिल परब यांचा फोन तपासा. त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल, तर नक्की तसे घडले असेल. उद्धव ठाकरेंच्या फोनवरुन फोन केला जात नाही, हे मला माहिती आहे,’ असे सांगून केसरकर यांनी ‘महानगर’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करा, आपण युती करू, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून दिल्याचे वृत्त मी वाचले. तुम्हाला वडिलांसमान मानणाऱ्या पक्षातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याबद्दल उद्धव ठाकरे असे बोलत असतील, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचे काय होत असेल? असा सवालही त्यांनी केला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -