घरराजकारण...याला म्हणतात सत्तेचा माज, किरण पावसकरांचा विरोधकांवर पलटवार

…याला म्हणतात सत्तेचा माज, किरण पावसकरांचा विरोधकांवर पलटवार

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शिवसेनेत बंड करणाऱ्यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख ठाकरे गटाकडून केला जात आहे तर, शिंदे गटाकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांबद्दल केला आहे. त्यातच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आज ट्वीट करताना ‘सत्तेचा माज’ असा उल्लेख केला आहे. त्याला शिंदे गटाचे सचिव किरण पावसकर यांनी ‘याला म्हणतात सत्तेचा माज’ असे सांगत ठाकरे सरकारच्या काळातील विविध घटनांची जंत्रीच दिली.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वतःला कोण समजता? सरकार आले म्हणजे काय मस्ती आली का? असा सवाल त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनी ‘काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून प्रश्न पडतो की गुंडगिरी आणि सत्तेची नशा एवढी आहे का, की त्यांच्या नव्या पक्षाचा आणि सरकारचा अंकुश नाही? जनतेला अशा भाषेत धमकावून काय सांगायचं आहे? हा सत्तेचा माज आहे की, काही न मिळाल्याचे नैराश्य?’ असे ट्वीट केले आहे.

- Advertisement -

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी याचा खरपूस समाचार घेतला आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे जाहीर केल्यावर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 13 दिवस जेलमध्ये टाकले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजकारणातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांबद्दल ‘असं झालं असतं, तर मी असं केलं असतं’ असं केवळ एक वाक्य म्हणाले होते. त्यावरून त्यांचा दौरा अर्धवट ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्या जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचे सांगत तीन वेळा मुंबई मनपाचे पथक पाठवले जाते. याला म्हणतात सत्तेचा माज, असे त्यांनी सुनावले.

अभिनेत्री कंगना रणौत यांनीही राजकीय मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्यावरही आक्षेप घेण्यात आला. त्याला मुद्द्यांद्वारेच उत्तर देता आले असते, पण मुंबई पालिकेत आपली सत्ता असल्याचा फायदा घेत पालिकेच्या एका पथकाकडून तिच्या घराबाहेरची एक शेड तातडीने पाडण्यात आली, यालाही सत्तेचा माज म्हणतात, असे सांगून पावसकर म्हणाले, त्यावेळी ती उद्धव ठाकरेंना म्हणाली होती की, आज तुम्ही माझे घर तोडले आहे, एक दिवस तुमची ‘घमेंड’ मोडेल. आता तसेच झाले आहे. रेडियो जॉकी मलिष्का हिच्याबाबतीतही हेच झाले. तिने मुंबईतील खड्ड्यांवरून गाणे तयार केले तर तिच्या घरची पाहाणी करायला पालिका अधिकाऱ्यांचे पथक पाठवले, हाही सत्तेचा माज असल्याचे ते म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -