भारतानं चांद्रयान-3 हे चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँड केलं आहे. भारतानं हा विश्वविक्रम रचल्यानं अनेक स्तरांतून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परंतु यातही राजकारण होत असल्याचंच चित्र आहे. अनेक नेत्यांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीकास्त्र डागलं आहे. एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलो मात्र दुसरीकडे आपली जनता महागाईने त्रस्त आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला. सोबतच त्यांनी इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं कौतुकही केलं. शरद पवार यांची कोल्हापुरात सभा आहे, त्यासभेदरम्यान संबोधित करताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. ( Kolhapur Dasara Chauk Sharad Pawar Rally criticized Modi Government on inflation)
शरद पवार म्हणाले की, बुधवारी आपल्या देशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. आपलं चांद्रयान-3 यशस्वी लँडही झालं, आपल्या देशातील तज्ज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं. ही कामगिरी करण्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे तर इस्रोची स्थापना करणाऱ्या पंडीत नेहरू यांचा. तसंच, इंदिरा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदी असोत, या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज ही इस्रो संघटना जगात महत्त्वाची ठरली आहे. इस्रोने आज हे चांद्रयान तयार केलं, परंतु ते तयार करण्यासाठी विक्रम साराभाई, सतीश धवन अशी अनेक नाव सांगता येतील, ज्यांचं यात योगदान आहे आणि त्यामुळे भारतानं आज चंद्राला गवसणी घातली आहे, असं शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा :अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं असावं; नाना पटोलेंचं वक्तव्य )
कोल्हापूर देशाला दिशा दाखवणारी नगरी
शरद पवार म्हणाले की, मिळालेली सत्ता सामान्यांसाठी वापरायची असते हे कोल्हापुरनं आपल्याला सांगितलं. शिवाजी महाराजांनी असं राज्य उभं केलं जे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. दुसरे एक राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता घेऊन समाजाच्या बाजूनं राहिलं. त्यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. ढोंगी लोकांनी त्यांनी कधी संमती दिली नाही, भोंदूहगिरीचा पुरस्कार शांहूंनी कधी केली नाही, ते म्हणजे शाहू महाराज, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांचा दाखला देताना भाजपवर निशाणा साधला.