बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बारामतीतील एक संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. येथील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी पवार आले होते. यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. (Maharashtra politics Sharad Pawar felt uneasy in the meeting in Baramati Prakriti stable advice for rest)
आता शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी पवारांची तब्येत तपासली असता ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर शरद पवारांनी नागरिकांना भेटायला सुरूवात केली आहे. दिवाळीनिमित्ताने पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना त्यांच्या बारामतीतील घरासमोर एकच गर्दी केली आहे.
शरद पवार यांचे वय 83 झाले तरी ते सातत्यानं दौरे करत असतात. सध्या ते दिवाळी सणामुळं बारामती येथील निवासस्थानी आहेत दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सर्व पवार कुटुंब एकत्र दिवाळी सण साजरा करतात. त्यासाठी शरद पवार हे देखील बारामतीत दाखल झाले आहेत. पण आज अचानक विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच शरद पवार यांना त्रास जाणवू लागला, त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच स्टेजवर
तब्येतीच्या कारणास्तव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात जरी उपमुख्यमंत्री अजित पवार येऊ शकले नाहीत. तरीही त्यांनी शारदोत्सवाच्या कार्यक्रमात मात्र उपस्थिती लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट बारामती गाठली. त्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर आले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभाहात दिवाळीच्या निमित्ताने शारदोत्सवाच्या कार्यक्रमात ते एकत्र आले.
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतील गदिमा सभागृहात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी गायिका बेला शेंडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
(हेही वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य…, संजय राऊत यांचा भाजपावर ‘रोखठोक’ हल्ला )