Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण आता पुन्हा सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत

आता पुन्हा सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत

Subscribe

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत, गुढीपाडव्यासाठी गावी जात असून, आता पुढचे तीन दिवस सभागृहात येणार नसल्याचे म्हटले आहे. सभागृहात बोलू दिले जात नाही, त्यामुळे आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, असे भास्कर जाधव य़ांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

भास्कर जाधव हा सभागृहातील एकही दिवस चुकवत नाही. पुढचे तीन दिवस सभागृहात येणार नाही, याबाबत मनात खूप वेदना आहेत. या वेळच्या अधिवेशनात मला जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. मला विषयही मांडू दिले जात नाहीत. मी नियमाने बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हे अधिवेशन, सभागृह आणि कामकाज नियमाने चालावे, कायद्याने आणि घटनेने चालावे, प्रथा आणि परंपरेने चालावे, यासाठी मी आग्रही असतो. सभागृहात लक्षवेधी मांडण्याचे काम सुरु आहे. परंतु, मी माझ्या किमान दोन लक्षवेधी लागाव्या यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु माझी एकही लक्षवेधी लागू शकली नाही. म्हणून मनामध्ये अत्यंत वेदना आहेत.

- Advertisement -

मला जर यावेळी सभागृहात बोलू दिले असते, तर मी मराठा आणि विदर्भातील शेतक-यांविषयी बोलणार होतो. तसेच, एक महत्त्वाचा मुद्दा मांडणार होतो. तो मुद्दा असा की, कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि रस्ते खराब होतात, असे सांगितले जाते. परंतु 1992-93 साली कोकणातील तत्कालीन एनराॅन कंपनीने म्हणजे आताच्या आरजीपीपीएल कंपनीने काम केले होते,  त्या रस्त्यांना आजदेखील एकही खड्डा पडलेला नाही. मग आता बनवलेले रस्ते कसे काय खराब होतात? त्यामुळे मी सरकारला सांगणार होतो की, यावर एक अभ्यासगट नेमा, जेणेकरुन कोकणातील रस्ते चांगले होतील, सरकारचा पैसा वाचेल आणि अधिका-यांचे काळे धंदे उघड होतील.

( हेही वाचा: एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार- ॲड. आशिष शेलार )

- Advertisement -

त्याचप्रमाणे, कृषी विभागावर बोलण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु मला संधी मिळाली नाही.  मी आता सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, मराठवाडा, विदर्भात ज्या आत्महत्या होत आहेत. त्यावर तुम्ही एक अभ्यासगट नेमा. मागच्या तीन- चार वर्षांत कोकणावर किती संकटं आली. तौक्ते, निसर्गचक्री वादळे आली. 2021 साली 22,23 तारखेला कोकणात प्रचंड महापूर आला. करोडोंचे नुकसान झाले. परंतु कोकणातील एकाही माणसाने आत्महत्या केली नाही. त्यामुळे कोकणातील लोकांकडे प्रसंगाच्या विरोधात, संकटांच्या विरोधात लढण्याची मानसिकता येते कुठून? याचा अभ्यास करणारा एक गट नेमावा आणि त्यातून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रबोधन करावे. हे मला सरकारला सांगायचे होते. परंतु मला ते बोलू दिले नाही. त्यामुळे हे सरकार संवेदनाहीन आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी सरकारवर केला आहे.

- Advertisment -