…की, शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? अमोल मिटकरी यांचा सवाल

मुंबई : राज्यात आता भाजपाच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस हे नवे मुख्यमंत्री असतील, अशी सर्वांनाच खात्री होती. पण फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करून धक्का दिला. पण हा मास्टरस्ट्रोक आहे की, शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

शिवसेनेतील जवळपास 39 आणि अन्य 11 अशा 50 आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून भाजपाचे समर्थन केले होते. परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात भाजपाप्रणित सरकार येईल या अपेक्षेने आमदार अमोल मिटकरी यांनी सकाळी ट्विट करून भाजपावर टीका केली होती. महाराष्ट्रात आता रामराज्य आले. भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार, महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली.

फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. तसेच नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022 असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू केली होती. त्यावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे, त्या अनुषंगाने मिटकरी यांनी हे ट्विट केले आहे.