Eco friendly bappa Competition
घर राजकारण शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई आणि मराठी चेहराच नाही!

शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई आणि मराठी चेहराच नाही!

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. शिंदे गट आणि भाजपा या दोघांकडून प्रत्येकी 9-9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात महिलांना संधी मिळाली नाही, यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पण मुंबई महापालिका तोंडावर आलेली असताना यात मुंबई आणि मुंबईतील मराठी चेहऱ्याला प्रतिनिधित्वच देण्यात आले नसल्याचे दिसते.

शिवसेना आणि भाजपाने युती करत 1995मध्ये पहिल्यांदाच राज्यातील सत्ता काबिज केली. त्यात सर्व विभागांचा समतो साधताना शिवसेनेने मुंबईतील आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आलाी होती आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दिवाकर रावते, लिलाधर डाके, गजानन कीर्तिकर तसेच माझगाव येथून छगन भुजबळांचा पराभव करणारे बाळा नांदगावकर यांच्याकडे मंत्रीपद सोपविले होते. तर भाजपाने दत्ता राणे, राज पुरोहित यांच्या माध्यमातून मुंबईला प्रतिनिधित्व दिले होते.

- Advertisement -

तर, 2014मधील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना मंत्रिमंडळात, विनोद तावडे, आशीष शेलार, प्रकाश मेहता, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, विद्या ठाकूर, रवींद्र वायकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करून मुंबईला महत्त्वाचे स्थान दिले होते.

यावेळी मात्र चित्र याच्या विपरित आहे. संजय राठोड व सुधीर मुनगंटीवार (विदर्भ); गुलाबराव पाटील, दादा भुसे, गिरीश महाजन आणि विजयकुमार गावित (उत्तर महाराष्ट्र); अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अतुल सावे व तानाजी सावंत (मराठवाडा); चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील व सुरेश खाडे (पश्चिम महाराष्ट्र); उदय सामंत व दीपक केसरकर (कोकण) तर, रवींद्र चव्हाण (डोंबिवली) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, मुंबईतून केवळ भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रिमंडळात आहेत.

- Advertisement -

शिंदे गट आणि भाजपाकडे सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, विद्या ठाकूर, भारती लव्हेकर, मनीषा चौधरी हे मुंबईचे आमदार असतानाही यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. एकीकडे मुंबई महानगरीतून मुंबईचा टक्का घटत चालला असताना मराठी चेहऱ्याला संधी देण्याऐवजी मंगलप्रभात लोढा (मारवाडी जैन) यांना भाजपाने संधी दिली आहे. सलग सहा वेळा आमदार राहणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांना तसे पाहिले तर, उशिरानेच संधी मिळाली आहे. पण त्यांच्याबरोबर भाजपाने आशीष शेलार, अतुल भातखळकर तर, शिंदे गटाकडून सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव यांच्यापैकी कोणाला संधी दिली असती तर, मुंबईला खरा चेहरा मिळाला असता, असे जाणकारांचे मत आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -