घरराजकारणशिवसेनेच्या लेखी खासदार नवनीत राणा 'सी ग्रेड' सिनेमाच्या अभिनेत्रीच!

शिवसेनेच्या लेखी खासदार नवनीत राणा ‘सी ग्रेड’ सिनेमाच्या अभिनेत्रीच!

Subscribe

मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांचा उल्लेख ‘सी ग्रेड’ सिनेमात काम करणारी अभिनेत्री असा उल्लेख केला आहे.

जळगावमधील एका गणेशोत्सव मंडळात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. त्यानंतर त्या म्हणाल्या, तुम्ही उद्धव ठाकरे असाल, तर मी पण नवनीत राणा आहे. हनुमानाने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली. लोकांच्या हिताचे सरकार आता मुंबई महापालिकेत यायला हवे. जे दोन पिढ्यांपासून मुंबईला खाण्याचे काम करत आहेत, त्या उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार.

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित एक घटना सांगत राणा यांचा उल्लेख ‘सी ग्रेड’ सिनेमाच्या अभिनेत्री, असा केला आहे. नवनीत राणा यांनी तोंड सांभाळून बोलावे, आपण ‘सी’ ग्रेड चित्रपटात काम करणाऱ्या एक अभिनेत्री आहात. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला, अशी बोचरी टीका संजना घाडी यानी केली.

यापूर्वी देखील नवनीत राणा यांना शिवसेनेने त्यांचा असाच उल्लेख केला आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा राणा दाम्पत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचे जाहीर केले तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘सी ग्रेड चित्रपट कलाकारांच्या माध्यमातून भाजपा स्टंटबाजी करण्यात गुंतली आहे’, अशी टीका केली होती. याचप्रकरणावरून राणा दाम्पत्याने पोलिसांवर आरोप केले. पण नंतर हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट होताच, ‘हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही’, असे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सुनावले होते. तर, दिल्लीत भाजपा नेत्यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना ‘नवनीत राणा या सी ग्रेड पब्लिसिटी स्टंटबाजी करतात’, अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -