Maharashtra Assembly Election 2024
घरराजकारणनाशिकमधील पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी घेणार बुधवारी निर्णय, अजित पवारांनी दिली माहिती

नाशिकमधील पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी घेणार बुधवारी निर्णय, अजित पवारांनी दिली माहिती

Subscribe

मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्याने काँग्रेसने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस (Congress) पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची चिन्हे असून याबाबत पक्षाकडून उद्या, बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज, मंगळवारी याबाबत माहिती दिली.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारी मतदान होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाच्या पाठिंब्याची अधिकृत घोषणा केली. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याबाबत उद्या, बुधवारी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

- Advertisement -

नाशिकच्या जागेसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असताना त्यांनी अर्ज दाखल न करता, त्यांचा मुलगा सत्यजित तांबे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी म्हणून जागावाटप करताना औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसला असा निर्णय झाला. पण, डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे, हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील, असेही पवार म्हणाले.

डॉ. तांबे हे विद्यमान आमदार असल्याने जागावाटपात नाशिकच्या जागेवर चर्चा झाली नाही. निवडणूक घोषित झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. मात्र, नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण आम्हाला लागली होती आणि त्याची कल्पना कॉंग्रेसच्या वरिष्ठांना दिली होती, असेही पवार यांनी सांगितले.
नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार नसणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. विधान परिषद निवडणुकीबाबत तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नव्हता, हे मी मान्य करणार नाही, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -