बाळासाहेबांचे हिंदुत्व मुख्यमंत्री शिंदे पुढे घेऊन जातील, निहार ठाकरेंना विश्वास

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० आमदारांनी ‘उठाव’ करून महाविकास आघाडी सरकार खाली खेचले. आता हेच हिंदुत्व एकनाथ शिंदे गट पुढे घेऊन जाईल, असा विश्वास बाळासाहेबांचे दुसरे नातू निहार ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांचे निहार ठाकरे हे चिरंजीव आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे ते जावई देखील आहेत. निहार ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व पुढे घेऊन जायची गरज आहे आणि मुख्यमंत्री शिंदे ते पुढे घेऊन जातील, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे हे आपलेच आहेत. त्यांचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास मला माहीत आहे. मी आपल्याच नेत्याला भेटायला आलो आहे. मी राजकारणात सक्रिय नाही. मात्र शिंदे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे निहार ठाकरे यांनी सांगितले. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी कोणतीही कायदेशीर मदत लागली तर, ती मी देईन, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे एकाकी!
शिवसेनतून आधी आमदार आणि नंतर खासदार शिंदे गटात सामील झाले. मधल्या काळात आजी-माजी नगरसेवकांसह शिवसेनेचे अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला अशी खंत व्यक्त केली होती. दुसरीकडे, त्यांचे चुलत बंधू मनसेप्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या विरोधात आहेतच. अलीकडेच त्यांनी ‘झी २४तास’ या वृत्त वाहनीला दिलेल्या मुलाखतीत ‘उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही,’ असे वक्तव्य केले होते.

तर, तीनच दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांचे कार्य मी पाहिले आहे. ते आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असल्याने त्यांना शुभेच्छा द्यायला मी आले असल्याचे स्मिता ठाकरे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. आता बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ते घरातून देखील एकाकी पडल्याचे चित्र आहे.