…मग काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा का? निलेश राणे यांचा शिवसेनेला सवाल

Nilesh Rane CM Uddhav Thackeray
निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना हॅटट्रिक साधणार का? अशी गेले काही दिवस जी चर्चा सुरू होती, तिला यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, यावरून भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मागील दोन वेळा विरोधात निर्णय घेतले होते. 2007च्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील या मराठमोळ्या असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी सांगितले होते. या निवडणुकीत प्रतिभाताई विजयी झाल्या होत्या.

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या 40 जागा रिक्त; आणखी पाचजण निवृत्तीच्या मार्गावर

त्यानंतर 2012मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा रालोआच्या विरोधात जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले होते. या निवडणुकीत संपुआतर्फे प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) तर रालोआचे उमेदवार म्हणून पी ए संगमा उभे होते. या निवडणुकीत देखील प्रणव मुखर्जी विजयी झाले होते. तर आताही शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे,

महाराष्ट्रातही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आदिवासी क्षेत्रात काम करत आहेत. काल झालेल्या बैठकीला आमशा पाडवी, निर्मला गावित उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर मुर्मू यांना पाठिंबा देण्याते ठरले, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. यावरूनच निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मग 2012मध्ये रालोआचे राष्ट्रपतीपदाचे आदिवासी उमेदवार पी. ए. संगमा यांना पाठिंबा न देता काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – राष्ट्रपतींच्या भावाचा श्रीलंकेतून पळ काढण्याचा प्रयत्न, संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखलं