हसावं की रडावं समजत नाही, निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

मुंबई : शिवसेनेमधील बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. तर, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. यावरून भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

कुटुंबप्रमुख म्हणून मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केले आहे. त्यावरून, घरातील मोठा भाऊ कसा असतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. ते सर्वांच्या चुका पोटात घेत आहे, असे कौतुक सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

त्याचबरोबर, एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताचा 144 आकडा नाही. त्यांच्याकडे फक्त 50 आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी हसावं की रडावं, हे समजत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54 आमदार असून ते सत्तेत आहेत आणि ज्या पक्षाचे 56 आमदार आहेत, त्याचा मुख्यमंत्री आहे, असे निदर्शनास आणून किती हुशार काही खासदार आपल्या देशाला मिळाले आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.