2024ला ‘फिर एकबार मोदी सरकार’, भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. गुजरातमध्ये भाजपाने रेकॉर्ड ब्रेक 156 जागा जिंकल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी, गुजरातची निवडणूक एकतर्फी होणारच होती, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला भाजपाने, 2024ला ‘फिर एकबार मोदी सरकार’, असे प्रत्युत्तर दिले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विधानसभेच्या 182 जागांपैकी 156 जागा जिंकल्या. काँग्रेसचा मात्र दारूण पराभव झाला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या 60 जागा कमी होऊन जेमतेम 17 जागांवर विजय मिळविता आला. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही पाच जागा जिंकल्या. तर, दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांपैकी काँग्रेसने 40 जागा मिळवत बहुमताचा (35) आकडा सहज पार केला, तर भाजपला 25 जागा मिळाल्या. आपने दिल्ली महापालिकेच्या 250 जागांपैकी 134 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे दिल्ली महापालिकेवरील भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपला 104 जागा मिळाल्या असून काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले.

गुजरातची निवडणूक एकतर्फी होणारच होती. मात्र याचा अर्थ असा नाही की, देशातील जनमत एकाच बाजूला झुकले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार गेले आहे. दिल्ली महापालिका निवडणूक तर याचे उत्तम उदाहरण आहे. राजकारणात पोकळी असते. गुजरातची पोकळी भाजपने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवाल यांच्या आपने भरून काढली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले.

त्याला आज भाजपाने ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. खरं आहे, गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल होत नाही. पण, गुजरातच्या निकालाने देशाचा मूड स्पष्ट झाला आहे. 2024ला पुन्हा ‘फिर एकबार मोदी सरकार’, असे भाजपाने म्हटले आहे. तुम्ही बारामतीला संपूर्ण महाराष्ट्र समजता त्याच काय? बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास होत नाही, असेही भाजपाने सुनावले आहे.