मुंबई : देशातील चार राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेशात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी जाहीरसभा झाली. भाजपाला सत्ता मिळाल्यास उत्तर प्रदेशातील रामलल्लाचे मोफत दर्शन मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – भाजपला मत देईल, तोच रामलल्लाचं दर्शन घेईल, असा कायदा केलाय का? शहांच्या वक्तव्यावरून राऊतांचं टीकास्त्र
मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर 2023 रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधक काँग्रेस यांच्यात खरी लढत आहे. गुनाच्या राघोगडमध्ये सोमवारी एका प्रचारसभेला अमित शाह यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. मंदिराचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न करणे आणि भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने सातत्याने आपल्या तीर्थक्षेत्रांचा आणि भारतीय संस्कृतीचा अपमान केला आहे. रामलल्ला 550 वर्षांपासून ‘अपमानित’ अवस्थेत होते. राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसने 70 वर्षे प्रलंबित ठेवला, त्यावर दिशाभूल केली आणि पुढे ढकलत ठेवला. तुम्ही 3 डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन करा, हे सरकार तुम्हाला प्रभू रामलल्लाचे मोफत दर्शन घेण्यासाठी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा – मध्य प्रदेशात भाजपा सरकार आल्यास अयोध्येत रामलल्लाचे मोफत दर्शन, अमित शहांचे आश्वासन
त्याबाबत राज्याचे माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यावरून माझा विश्वास अजूनच दृढ होतो, भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत बाकी काही नाही. श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे हे विधान देशभरातील, जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारे आहे. संपूर्ण जगात हिंदू बांधव पसरले आहेत. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत दर्शन घडविण्याचे आमिष दाखवले जात आहे. वास्तविक पाहता, श्रद्धा हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचा असा बाजार मांडणे हे जगभरातील रामभक्तांच्या श्रद्धेशी, भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.