कांदा-कापूस प्रश्नावरुन विधान परिषदेत दिवसभर गदारोळ, विरोधक नौटंकी करतात – दरेकर

गोंधळामुळे आज दिवसभरात दोन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकाकडून नियम २८९ नुसार आजच चर्चेची मागणी लावून धरण्यात आली, मात्र ही मागणी फेटाळली गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

मुंबई – विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नौटंकी करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. कांदा, कापूस, धान, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषदेत गोंधळ केला. या गोंधळामुळे आज दिवसभरात दोन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकांकडून नियम २८९ नुसार आजच चर्चेची मागणी लावून धरण्यात आली, मात्र ही मागणी फेटाळली गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आघाडीवर होते. (Praveen Darekar alleges that the opposition is playing drama on the issue of farmers)

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  (Opposition leader Ambadas Danve) यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवला. कांदा, कापूस, धान, द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न गंभीर असल्याचं दानवे म्हणाले.

जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याने पंतप्रधानांना पत्र लिहून आत्महत्या केली. आताही राज्यात तिच परिस्थिती आहे. शिंदे-फडणवीसांच्या काळात काही वेगळं झालं नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्याचा चेक सभागृहात झळकावला. रवींद्र चव्हाण या शेतकऱ्याला दोन रुपयांचा १५ दिवसांनंतर वटणारा चेक देण्यात आला. याची माहिती सभागृहाला दिली. यावर विरोधी बाकांवरुन शेम-शेमचा जोरदार आवाज घुमला.
शेतकरी कांद्याच्या शेतात ट्रॅक्टर फिरवत आहेत.
स्वाभीमानी शेतकरी संघटनचे रवीकांत तुपकर यांनी विदर्भात आंदोलन सुरु केले तर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. यावरुन सरकार शेतकऱ्यांबद्दल किती गंभीर आहे, हे दिसून येते असा टोला दानवेंनी लगावला.

कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, ही शेतकऱ्याची टिंगल आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

हेही वाचा : कांद्यावरुन विधान परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब; एकनाथ खडसेंनी महाजनांना करुन दिली आठवण, म्हणाले…

प्रवीण दरेकर आक्रमक
विरोधकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांच्या गदारोळात ते आपलं म्हणणं मांडू शकले नाही. यानंतर भाजपचे आमदार आक्रमक झाले. प्रवीण दरेकरांनी विरोधक नौटंकी करत असल्याचा आरोप केला.
विरोधक शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत, असा आरोप दरेकरांनी केला. उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत मात्र विरोधी पक्षाला उत्तर नको आहे. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाटक करत असल्याचा आरोप दरेकरांनी केला. यावेळी विरोधी पक्षाच्या बाकावरुन जोरदार घोषणाबाजी सुरु होती.

सरकार २८९ नुसार चर्चेला तयार असल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. उद्या गटनेत्यांच्या बैठकीत कांदा, कापूस प्रश्नावर चर्चेसाठी वेळ ठरवण्यात येईल, असंही उपसभापती यांनी सभागृहाला सांगितलं. मात्र विरोधक आजच चर्चेसाठी आग्रही दिसले. त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीतच उपसभापतींनी आजचे कामकाज संपल्याचं जाहीर केलं.

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सरकारने त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या याची विचारणा विरोधकांकडून सभागृहात करण्यात आली. या गोंधळातच विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले.