घरराजकारणउत्तम टीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या मंत्रिमंडळाला मराठीत शुभेच्छा

उत्तम टीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या मंत्रिमंडळाला मराठीत शुभेच्छा

Subscribe

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर झाला. शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपाच्या प्रत्येकी नऊ आमदारांनी शपथ घेतली. या नव्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्वीट करत अभिनंदन केले आहे. ही टीम उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गेल्या 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. पण एक महिना होऊन गेल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर शिंदे सरकार होते. पण आज अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभुराज देसाई आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपदाची शपथ दिली. या विस्तारात विधान परिषदेतील भाजपा तसेच शिंदे गटातील एकाही सदस्याचा तसेच या सरकारला पाठिंबा देणारे इतर घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांचा समावेश करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

शिवाय, एकूण 20 जणांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळणं हे खूप दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तर, हा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एक जोक आहे, अशी खिल्ली यशोमती ठाकूर यांनी उडवली आहे.

तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र नव्या मंत्रिमंडळाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -