घरराजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फोडाफोडीस उत्तेजन, संजय राऊत यांचा थेट आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फोडाफोडीस उत्तेजन, संजय राऊत यांचा थेट आरोप

Subscribe

मुंबई : राजकीय पक्षांना टिकू द्यायचे नाही व सर्व सत्ता एका-दोघांकडे असावी हा विचार म्हणजेच घोटाळा आहे. देशात गवतासारख्या वाढणाऱ्या आणि फुटणाऱ्या राजकीय पक्षांच्या तसेच नेत्यांच्या तावडीतून देशाला सोडविण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या फोडाफोडीस उत्तेजन देत आहेत, असा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांची 27 एप्रिल रोजी आपण भेट घेतली. देशात हुकूमशाही सुरू झाली आहे व सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे, असे सांगतानाच, निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर अन्याय केला,” असे सत्यपाल मलिक म्हणाल्याचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटवले तेव्हा मलिक हेच राज्यपाल होते. म्हणजे मोदी यांचे ते विश्वासू होते. पण आता दिल्लीतील आर. के. पुरम भागातील एका हाऊसिंग सोसायटीत भाड्याच्या घरात सत्यपाल मलिक राहतात. एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे त्यांचे जगणे आहे. जम्मू-कश्मीरसह चार राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले. मोदी सरकारने त्यांना जम्मू-कश्मीरला नेमले व आता ‘पुलवामा’ जवान हत्याकांडाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित करताच, “मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत.” असे भाजपचे लोक बोलू लागले. हे गैर असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

तुमच्या मागे तपास यंत्रणा लावू शकतात, असे म्हटल्यावर, मी घाबरत नाही. मी समाजवादी विचारांचा कडवट लोहियावादी आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही, असे ते म्हणाले. 2024 ला काय होईल? असे विचारले असता, एकासमोर एक उमेदवार हे सूत्र मान्य झाले तर मोदींचा दारुण पराभव होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी संपूर्ण देशात जाणार आहे. मला फिरण्यापासून आणि बोलण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. संविधानाच्या रक्षणासाठी बाहेर पडावे लागेल. लवकरच महाराष्ट्रातही येऊ, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सत्यपाल मलिक यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका पार पाडावी, असे काही जणांना वाटते. पण देशातल्या विरोधी पक्षांना कुणाचेही एकछत्री नेतृत्व नको. सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारला सरळ अंगावरच घेतले आहे. ते हिमतीचे आहेत. शेतकरी व जाट समाजाचे ते नेते आहेत. जाट हा लढवय्या समाज आहे. “मला काही केले तर माझा समाज स्वस्थ बसणार नाही हे केंद्र सरकारला माहीत आहे,” असे मलिक म्हणाले. सत्यपाल मलिक लढत आहेत, संविधान वाचविण्यासाठी, असे संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -