आता ‘गद्दार’ कोण नंदिनी विचारे की, ठाण्यातील 66 माजी नगरसेवक?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात 66 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याने ठाण्यात शिवसेनेला असा धक्का बसणार, हे अपेक्षितच होते. पण माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी मूळ शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे आता ‘गद्दार’ कोण अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा पुरस्कार करत एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. आता माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील 66 माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला. केवळ माजी नगरसेविका नंदिनी विचारे या त्यांच्यासोबत नव्हत्या. ठाणे पश्चिमच्या चरई चंदनवाडी प्रभागातून त्या सलग दोन वेळा पालिकेवर शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, लोकसभेतील शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद राजन विचारे यांच्या पत्नी होत.

ठाण्यात 1989मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 30 नगरसेवक निव़डून आले होते. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौरपदासाठी उमेदवार होते. पण 30 नगरसेवकांचे पाठबळ असतानाही शिवसेनेला महापौरपद मिळाले नव्हते. अवघ्या एक मताने प्रकाश परांजपे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे वसंत डावखरे विजयी झाले.

हेही वाचा – …म्हणून भावना गवळी यांना चीफ व्हिप पदावरून हटवले, संजय राऊत यांनी केला खुलासा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गद्दार’ कोण आहे, ते शोधण्याचे आदेश दिले. त्यावर आनंद दिघे यांनी, ‘गद्दारांना माफी नाही,’ असे म्हटले होते. ठाण्यात तशी पोस्टरही झळकली होती. महापौर निवडणुकीत जे मत फुटले ते तत्कालीन नगरसेवक श्रीधर खोपकर यांचे होते, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर महिन्याभरातच श्रीधर खोपकर यांचा खून झाला. याप्रकरणी आनंद दिघे यांच्यावर ‘टाडा’ कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. पुढे 2001मध्ये आनंद दिघेंच्या मृत्यूपर्यंत ही केस सुरू राहिली. पण न्यायालयात काहीच सिद्ध होऊ शकलं नाही.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि रवींद्र फाटक हे आनंद दिघे यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. आता एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर रवींद्र फाटक हे त्यांच्या गोटात सामील झाले. पण राजन विचारे यांनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता ठाण्यातील 66 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे हे शिवसेनेतील ह गद्दार की, नंदिनी विचारे गद्दार, अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे.

आता कोणत्या महापालिका?
ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने हे लोण आता कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिकांपर्यंत पोहोचते का, हे लवकरच स्पष्ट होईल. साधारणपणे आठ वर्षांपूर्वी पालघर हा ठाणे जिल्ह्याचाच भाग होता. या जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत शिवसेनेची फारशी पकड नसली तरी, तिथेही पक्षात फूट पडते का? तसेच ठाण्याच्या नजीक असलेल्या पनवेल महापालिकेतही याचे पडसाद उमटतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.