घरराजकारणवादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी महाराजांनी साधला आव्हाडांवर निशाणा

वादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी महाराजांनी साधला आव्हाडांवर निशाणा

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर चौफेर बाजूंनी टीका होत आहे. आता माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयो वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबद्दल भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ट्विटरवरून आव्हाडांवर टीका केली होती. या टीकेला सुद्धा आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यामातून नेटकऱ्यांनी टीका केली. पण आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबतचे ट्विट छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे.

“जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा छत्रपती संभाजी महाराजांनी या ट्विटच्या माध्यमातून आव्हाडांना दिला आहे.

- Advertisement -

“जाहीर निषेध! मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितुजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुती सुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नको. शेवटी’जित्या’ची खोड… तेच खरं.” असे ट्विट सुरुवातीला भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देत “हे सगळे समजायला अक्कल लागते… औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार… जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही… झाकली मूठ सव्वालाखाची,” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

- Advertisement -

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मी काहीही चुकीचे बोलले नसल्याचे आव्हाडांकडून सांगण्यात आले आहे. तर याबाबत त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केले आहे. “रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज कुठे असते … हे कोण बोलले …, आणि ह्यावर कोण कोण तुटून पडले … मी काही ही चुकीचे बोललो नाही … महाराजांचे स्वकरतुत्व झाकून ठेवायची ह्यांची जुनी सवय आहे …” असे ट्विट करत आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -