घरराजकारणहवशे-नवशे घेऊन भाजप पक्ष उभा : संजय राऊत

हवशे-नवशे घेऊन भाजप पक्ष उभा : संजय राऊत

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून भाजपवर पुन्हा एकदा तोफ डागण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. यावरून राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि इतर राजकीय घडामोडींवर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्यांवरून त्यांना लक्ष केले. भाजपकडे त्यांच्या विचाराचे आता कोणीही राहिले नाही. तसेच हवशे-नवशे-गवशे घेऊनच भाजप पक्ष उभा राहिला असल्याची टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे.

भाजप कोणालाही सामावून घ्यायला तयार आहे. त्यांच्या पक्षामध्ये सध्या कोणी उरले नसून त्यांच्याकडून रिकाम्या जागा भरायची काम सुरु आहे, असा टोला राऊतांकडून लगावण्यात आला. यावेळी त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेचे देखील उदाहरण दिले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे आणि तिथे भाजप कार्यकर्ते घडवण्याचे उद्योग करते. बहुदा त्या कार्यकर्ते घडवण्याच्या उद्योगाला, त्या संस्थेला त्यांनी टाळे लावल्याचे दिसतेय. म्हणून इतर पक्षाचे रेडिमेड आणि तयार कार्यकर्ते घेऊन आपला पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडून धडपड सुरु आहे. मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल. मूळचा भारतीय जनता पक्ष आहे कुठे?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपण जर पाहिलं तर सगळे इथून-तिथून घेऊनच सध्याचा भाजप पक्ष उभा आहे. मूळ विचारांचा पक्ष आहे कुठे? याविषयी सुद्धा बावनकुळे यांनी बोलावे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आम्ही घडवलेले कार्यकर्ते हे मानसिक दबावाने स्वतःच्या पक्षात घेऊन पक्ष वाढवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप सुद्धा राऊत यांच्याकडून यावेळी करण्यात आला आहे. तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुद्धा भाजपच्या विचारांचे नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा – RBI चा सामान्यांना ‘जोर का झटका’, रेपो दरात वाढ, EMI वाढणार

- Advertisement -

संजय राऊत यांनी यावेळी राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणाचे कौतुक केले. राहुल गांधी यांचे भाषण हे प्रखर सत्य सांगणारे भाषण होते. एका वेगळ्या राहुल गांधींचा या भाषणामुळे साक्षात्कार झाला. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी या विषयाची मांडणी केली त्यामुळे सत्ताधारी देखील याविषयावर काही बोलले नसल्याचे राऊतांनी सांगितले. सत्य बोलणे क्रांतिकारी काम असतं, हे काम राहुल गांधी यांनी केले. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हे परखडपणे सत्य मांडत राहिले, त्याप्रमाणे राहुल गांधी सत्य बोलले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेबाबत भाष्य करण्यात आले. आजची पत्रकार परिषद ही महत्वाची असणार आहे. भविष्यातील घडामोडींचा वेध घेणारी आणि त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणारी ही पत्रकार परिषद असणार आहे, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -