“बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना;” संजय राऊतांची राणेंवर खोचक टीका

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आपले मत व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घडामोडीवर आपले मत व्यक्त केले आहे.

He will tell the reason of betrayal in the court; Sanjay Raut

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत हे आज कणकवली येथे आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आणि इतर सर्व बाबींवर आपले मत व्यक्त केले आहे. पण याचवेळी त्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर नितेश राणे, नारायण राणे यांनी आनंद व्यक्त केला पण याचमुळे “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” असे म्हणत संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्राला खोचक टोला लगावला आहे.

कणकवली येथून पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून काल संध्याकाळी हा निर्णय देण्यात आला. निवडणूक आयोगातील पोपटरावांनी परस्पर ठरवून शिवसेनेची मालकी कोणाकडे द्यायची? याचा निर्णय दिला. त्यानंतर कोकणात आणि विशेषतः कणकवलीमध्ये जल्लोष करण्यात आला. याचे काही फोटो देखील आज पाहिले. या फोटोमध्ये मोजून सात चेहरे होते. यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.. जे शिवसेना आधी सोडून गेले आहेत. ते यांच्याबरोबर फटाके वाजवत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन तुमची शिवसेना वाढणार आहे का? असा म्हणत राऊतांनी नितेश राऊत यांच्यावर टीका केली.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या गटात देखील आनंद पाहायला मिळाला. कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी फटाके फोडत जल्लोष केला. ज्यामुळे संजय राऊत यांच्याकडून राणेंवर सडकून टीका करण्यात आली. तर ठाकरे गटाला धक्का बसल्यानंतर नितेश राणे यांनी याचे खापर आदित्य ठाकरेंवर फोडले. आदित्य ठाकरेंनी सत्तेत मंत्री असताना नाईट लाईफ सुरु केली, नको त्या गोष्टी केल्या ज्यामुळे आज जे काही घडले ते चांगले घडले असल्याचे ते म्हणाले होते.

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “रावणाला कधी धनुष्यबाण पेलवणार नाही. तो एक दिवस त्यांच्या छातीवर पडणार आहे.” पुढे ते म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारणे आता गरजेचे बनले आहे. राजकीय पक्षाची व्याख्या काय आहे, हे निवडणूक आयोगाने सांगावे. एक पक्ष ५० वर्षांपासून उभा असून घटनेनुसार चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार,खासदार अमिषाला बळी पडून बाहेर पडले. म्हणून पक्ष त्यांच्या मालकीचा कसा होऊ शकतो? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा – ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर ठाकरे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आयोगाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि नेत्यांची तातडीची बैठक देखील बोलावली आहे.