शरद पवार भाजपसोबतच; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीची गरज शिवसेनेला नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची ती गरज होती. शिवसेनेने काही तर करुन सत्ता आपल्या हातात ठेवायला पाहिजे होती. असे झाले असते तर सरकार पडले नसते.

Prakash Ambedkar

मुंबईः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबतच आहेत, असा दावा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेची नुकतीच युती झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही युती आहे. ह्या युतीत सामील होण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसही इच्छुक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला. हा दावा करताना प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली. या शपथविधीचा खुलासा अजित पवार यांनी केला होता. मला दोष कशाला देता. आमच्या पक्षाचा तो निर्णय होता. लोकसभा निवडणुकीआधीच सर्व ठरले होते. मी फक्त पुढे गेलो, असे अजित पावार यांनी सांगितले होते. त्यामुळे शरद पवार हे अजूनही भाजपसोबतच आहेत हे लवकरच कळेल, असे प्रकाश आंबेडकर यांंनी सांगितले.

या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीची गरज शिवसेनेला नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची ती गरज होती. शिवसेनेने काही तर करुन सत्ता आपल्या हातात ठेवायला पाहिजे होती. असे झाले असते तर सरकार पडले नसते.

हिंदुत्त्ववादाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोघेही हिंदुत्त्वादी आहेत. दोघात सध्या भांडण आहे. उद्धव ठाकरे बदलले आहेत, असे मी म्हणणार नाही. पण मी जे भांडण म्हणतोय त्यात वैदीक हिंदू व संत हिंदू परंपरा हा संबंध आहे.

गेल्या वर्षी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी साद घातली होती. या युतीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी होकार कळवला. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीसाठी होकार देण्यात आला नव्हता. अखेर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला वंचित बहुज आघाडी व शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उभयंतांनी केली.