बारामती : ‘आता माघार नाही’ असं म्हणत थेट बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना आव्हान देणारे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अखेर बंडाची तलवार म्यान केली आहे. पुरंदरचा तह करत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचंं आज (शनिवार) जाहीर केलं. आपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण होत असल्यानं माघार घेत घेतल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं. शिवतारे यांच्या माघारीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
हेही वाचा… Devendra Fadnavis : महायुतीत अजूनही 4-5 जागांचा तिढा, फडणवीसांनीच केले मान्य
शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणारच, अशी घोषणा करून अजित पवार यांना अडचणीत आणलं होतं. त्यानंतर शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संबंध ताणले गेले होते. एकीकडे सुनेत्रा पवारांचा प्रचार तर दुसरीकडे शिवतारेंची लोकसभा निवडणुकीत एन्ट्री करण्याची घोषणा यामुळे महायुतीत ऑल इज वेल नसल्याचं स्पष्ट झाले होतं. त्यामुळे शिवतारेंची समजूत काढणं ही शिंदेंची डोकेदुखी बनली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली. तरीही शिवतारे माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उद्या (शनिवारी) कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी घोषणा केली होती. तेव्हाच त्यांचं बंड शमल्याची चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा… Ambadas Danve : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर दानवे संतापले, म्हणाले – मानहानीचा दावा करणार
निमित्त गुंजवणी प्रकल्पाचं
पाच वर्ष गुंजवणीचा प्रकल्प रखडला. मी आमदार असतो तर हा प्रकल्प पूर्ण झाला असता. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गुंजवणीचं पाणी पुरंदरला देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने मी बारामतीमधून माघार घेत असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं.
15 ते 20 जागांचा प्रश्न
बारामतीमधून लढण्याचा निर्णय घेतल्याने मी माघार घेत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रागावले होते. एवढंच नाही तर माझ्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची अडचण झाली होती. शिवाय माझ्यामुळे 15 ते 20 खासदार पडतील असं सांगण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीने फोन केल्यानंतर माघार घेत असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.