घरराजकारणनवी मुंबईत भाजपा-मनसे युतीची चिन्हे? अमित ठाकरे-संदीप नाईक भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी मुंबईत भाजपा-मनसे युतीची चिन्हे? अमित ठाकरे-संदीप नाईक भेटीमुळे चर्चांना उधाण

Subscribe

नवी मुंबई : गेल्या अडीच-तीन वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे वारंवार बदलताना दिसत आहेत. शिवसेनेत झालेल्या उठावामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले आणि पाठोपाठ शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. आता नवी मुंबईत भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या युतीचे संकेत मिळू लागले आहे.

मनविसे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित ठाकरे यांची आज (२५ जुलै) ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक यांचे पुत्र आणि ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांनी वाशीत भेट घेतली. त्यामुळे नवी मुंबईत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मागील काही भाषणांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाशी सूर जुळवल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजपा-मनसेची युती व्हावीच, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्येही रंगली आहे.

- Advertisement -

महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने अमित ठाकरे आज नवी मुंबईत आले होते. वाशी टोलनाक्यावर महाराष्ट्र सैनिकांकडून अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अमित ठाकरे यांच्या महासंपर्क दौर्‍याला सुरुवात झाली. याचदरम्यान वाशी येथे माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे देखील उपस्थित होते. अमित ठाकरे आणि संदीप नाईक यांच्या समवेत सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. यात राजकीय चर्चा देखील झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या मनसे रिंगणात उतरलेली नाही.

हेही वाचा – राज्यपाल पद, राज्यसभेचे तिकीट 100 कोटीला! सीबीआयने केला महाराष्ट्रातील रॅकेटचा पर्दाफाश

- Advertisement -

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेतली असल्याने तसेच राज्यातील राजकीय चित्र बदलल्याने आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेने भाजपाशी युती केल्यास नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याशी या भेटीविषयी संपर्क साधला असता त्यांनी अमित ठाकरे आणि माजी आमदार संदीप नाईक यांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

हेही वाचा – …लगेच बाळासाहेब आठवले, राणे बंधूंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -