Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण 'बाळासाहेब आणि वाजपेयींनाही जे जमलं नाही, ते मी केले'...तानाजी सावंतांचा धाडसी दावा

‘बाळासाहेब आणि वाजपेयींनाही जे जमलं नाही, ते मी केले’…तानाजी सावंतांचा धाडसी दावा

Subscribe

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षाही जास्त गर्दी जमवल्याचे म्हणत, सावंतांनी आत्मस्तृती केली आहे.

शिवसेनेचे नेते आणि विद्यमान सरकारमधील मंत्री तानाजी सावंत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा त्यांनी असेच काहीसे वक्तव्य करत धाडसी दावा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षाही जास्त गर्दी जमवल्याचे म्हणत, सावंतांनी आत्मस्तृती केली आहे.

शिवसेनेचे प्रभावी नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केलेल्या बंडखोरीत तानाजी सावंत यांचा समावेश होता. नुकतेच त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचे बंडखोरीसाठी मतपरिवर्तन करण्यासाठी राज्यात तब्बल 150 बैठका मी घेतल्या, असे विधान छत्रपती संभाजीनगरमध्ये केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून तानाजी सावंत चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा असेच वक्तव्य केले आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

- Advertisement -

पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी हे विधान केले आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी आपल्या सभांना बाळासाहेब ठाकरेंपेक्षाही गर्दी जमवल्याचा दावा केला.

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत ?

या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहित होते, जे पटांगण आपण घेतले होते सभेसाठी, ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनाही भरले नाही. आमचे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरले नव्हते, अडवाणीजी यांनाही हे पटांगण भरले नाही आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी 2017-18 च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करुन दाखवली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंडखोरी – तानाजी सावंत

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये परंडा भागात आयोजित केलेल्या भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीबाबत भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप- शिवसेना युतीला कौल दिलेला असतानाही शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला आणि जनमत डावलून ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येदेखील मला स्थान दिले नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर जाऊन त्यांना सांगून आलो की मी पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नाही. त्यामुळे संतप्त होऊन आणि फडणवीस यांच्या आदेशाने 3 जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली, असे तानाजी सावंत म्हणाले होते.

 

- Advertisment -