हैदराबाद : तेलंगणामध्ये या महिन्याच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. त्यामुळे येथील प्रचार आता टिपेला पोहोचला आहे. असे असताना तेलंगणात मोठी घटना घडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भारत राष्ट्र समितीचे (BRS) आमदार गुवाला बालाराजू यांच्यावर हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. गुवाला बालाराजू हे अछामपेट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा – आजच्या समाजाची अवस्था रामायणातील बेडकासारखी…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा
बालाराजू शनिवारी रात्री आपल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार करत होते. यादरम्यान, काँग्रेसचे उमेदवार वामसी कृष्णा यांनी, बलराजू मतदारांना पैसे वाटत घेत असल्याचा आरोप केला. तसेच बालाराजू यांच्या गाडीत पैसे असल्याचाही त्यांनी दावा केला. बालाराजू यांनी त्याला इन्कार केला. मात्र, आमदारांच्या गाडीची तपासणी करण्यावर काँग्रेस समर्थक ठाम होते. यानंतर बीआरएस समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि अखेर दगडफेक सुरू झाली.
#WATCH | Nagarkurnool, Telangana: Last night, a clash occurred between BRS and Congress leaders in Achampet. (11.11) pic.twitter.com/4Geh6F0D2G
— ANI (@ANI) November 12, 2023
या दगडफेकीदरम्यान बीआरएस आमदार बालाराजू यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तर, दगडफेकीत गुवाला बालाराजू हे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य…, संजय राऊत यांचा भाजपावर ‘रोखठोक’ हल्ला
तेलंगणा सरकारचे मंत्री आणि बीआरएस नेते केटी रामाराव यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन जखमी आमदार गुवाला बलराजू यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. हे अत्यंत दुर्दैवी असून लोकशाहीत अशा घटनांना स्थान नसावे. या घटनेत जे सहभागी असतील, त्यांना नक्कीच शिक्षा होईल, अशी अपेक्षा करतो. विरोधी गटात तणाव असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसत आहे. आपला निवडणुकीत पराभव होणार असल्याचे त्यांनाही कळून चुकले आहे, असे त्यांनी सुनावले आहे.