शिंदे आणि फडणवीस यांचे अखेर ठरले : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचा सस्पेन्स लवकरच दूर होणार आहे. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत हा विस्तार होणार आहे. तर, यात शिंदे गटाचे १५ तर, भाजपाचे २५ मंत्री असण्याची शक्यता आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकार गडगडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता हा विस्तार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्याचा फॉर्म्युलाही ठरला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन आज एक महिना झाला. मात्र मधल्या काळात सर्वांना प्रतीक्षा होती, ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, हेच उत्तर प्रत्येकवेळी देत होते. तर दुसरीकडे, यावरून विरोधक कायम टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही हातात मंत्रिमंडळाचे फारसे काही दिसत नसून, दिल्लीतून जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत ते काही करु शकत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘दोघांचे जम्बो मंत्रिमंडळ’ असे म्हणून तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘दोन लोकांचे अपंग मंत्रिमंडळ’ असे म्हणून हिणवले आहे.

या पार्श्वभूमीवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, विशेषत: आठवड्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यांच्यात मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गटाला ३५ टक्के तर, भाजपाला ६५ टक्के मंत्रीपदे मिळतील. जम्बो मंत्रिमंडळ पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार ४२ मंत्रिपदांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. ते ध्यानी घेता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित ४० पदांपैकी शिंदे गटाला १५ तर, भाजपाच्या वाट्याला २५ मंत्रीपदे येतील आणि यात राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे आता मंत्रीपदाची लॉटरी कोणाकोणाला लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.