घरराजकारणन्यायनिवाडा होईपर्यंत संजय राठोडांविरुद्ध लढा सुरूच राहणार, चित्रा वाघ यांचा निर्धार

न्यायनिवाडा होईपर्यंत संजय राठोडांविरुद्ध लढा सुरूच राहणार, चित्रा वाघ यांचा निर्धार

Subscribe

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पाठपुरवा सुरूच असून न्यायनिवाडा होईपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे, असा निर्धार भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी व्यक्त केला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या पत्रकार परिषदेत झालेल्या वादामुळे वर्ध्याला त्यांच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय तेथील पत्रकारांनी घेतला आहे.

पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीला मी प्रत्यक्ष ओळखत नव्हती. ती महाराष्ट्राची कन्या होती. प्रसार माध्यमांकडून जे पुरावे समोर आले, त्या आधारे मी तिच्या मृत्यूचा पाठपुरावा केला. संजय राठोड हे मंत्री असले काय किंवा नसले काय, अजूनही माझी लढाई संपलेली नाही. मी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात चित्रा वाघ यांनी रान उठवले होते. त्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण राज्यात जूनमध्ये सत्तांतर झाल्यावर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासनमंत्री बनविण्यात आले आहे. क्लीनचिट मिळाल्याने त्यांना मंत्रीपद दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, क्लीनचिट महाविकास आघाडी सरकारने दिली आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्र्यांना याबद्दल विचारले पाहिजे. माझी भूमिका त्यांचा शपथविधी झाला, तेव्हाच जाहीर केली आहे.

याच पत्रकार परिषदेदरम्यान, संजय राठोड यांना क्लीन चिट असल्याचे त्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. असे असताना तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचे आयुष्य बर्बाद झाले नाही का, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर चित्रा वाघ संतप्त झाल्या. मला शिकवण्याची गरज नाही, अशा सुपारीबाज पत्रकारांना बोलावू नका, असे त्या म्हणाल्या. त्यांनी एका ज्येष्ठ पत्रकाराचा अपमान केल्याने आज वर्धा येथे आयोजित त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तेथील सर्व संघटनांनी घेतला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -